मुलींचे अपहरण करून अत्याचाराचे सत्र सुरूच

आणखी एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार

महिलांवरील अत्याचारासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने चिंता व्यक्त केली असताना गेल्या काही दिवसांपासून उपराजधातील अपहरण करून बलात्कार करण्याच्या नियमित घटना घडत आहेत. सोमवारीही एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका अल्पवयीन मुलाने अल्पवयीन मुलीचे अपहरण करून सतत तीन दिवस तिच्यावर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.

आरोपी मुलगा हा १७ वर्षांचा असून पीडित मुलगी ही १६ वर्षांची आहे. आरोपी आणि पीडित मुलगी मामेभाऊ आहेत. १९ एप्रिलला पीडित मुलीच्या मैत्रिणीच्या भावाचा लग्नसोहळा होता. यासाठी ती महाजनवाडी येथे गेली होती. तेथे आरोपी मुलगाही होता. रात्री १० वाजताच्या सुमारास मुलगी समारंभातून घरी परत निघाली. मात्र, वाहन न मिळाल्याने तिने मुलाला घरी सोडून देण्याची विनंती केली. मात्र, त्याने तिला तिच्या घरी न नेता आपल्या घरी नेले व तेथे सतत तीन दिवस तिच्यावर अत्याचार केला. तीन दिवसांनी मुलाने तिला तिच्या घरी सोडले. तिच्या आईवडिलांनी तिची कसून चौकशी केली असता हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. त्यानंतर तिच्या आईवडिलांनी मुलीला घेऊन पोलीस ठाणे गाठले व तक्रार दिली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक आर.एन. बारड यांनी गुन्हा दाखल करून मुलाला ताब्यात घेतले.

१८ एप्रिलला आमदार निवासात एका मुलीवर सतत तीन दिवस सामूहिक अत्याचार करण्यात आला होता. त्यानंतर सीताबर्डी परिसरातून एका मुलीचे अपहरण करून सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची घटना उघडकीस आली. आता पुन्हा अत्याचाराची घटना उघडकीस आल्याने महिलांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

‘त्या’ मुली सापडल्या

काटोल मार्गावरील बालसुधारगृहातून २० एप्रिलला पळालेल्या तीन मुलींचा शोध घेण्यात पोलिसांना यश आले. २० एप्रिलला पहाटे ६.३० वाजताच्या सुमारास बालसुधारगृहातून चार मुली पळाल्या होत्या. २१ एप्रिलच्या संध्याकाळपर्यंत सर्व मुली सोबत होत्या. नंतर सीताबर्डीतून त्या वेगवेगळ्या दिशेला गेल्या. त्यापैकी एक मुलगी सामूहिक बलात्काराला बळी पडली होती. तिघी बेपत्ताच होत्या. त्यांना सोमवारी पकडण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *